
आ.निलेश राणे यांच्या हस्ते पुल बांधणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा
कुडाळ : प्रतिनिधी
हळदीचे नेरुर गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, येत्या वर्षभरात येथील पुलाचे काम पूर्ण होईल. या पुलामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल. ठेकेदाराने मार्च महिन्यापर्यंत पूल पूर्ण करण्याचे सांगितले आहे मात्र काम दर्जेदार व्हावे, ही आपली अपेक्षा आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. माणगांव खो-यातील हळदीचे नेरुर येथे पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते आज बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जि.प.उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, दिलीप सावंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, देवेंद्र नाईक, निवृत्त पोलीस अधिकारी सतीश कविटकर, राजा धुरी आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले की, या पुलाच्या कामासाठी स्थानिक ग्रामस्थ दिलीप सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे आज या कामाचे भूमिपूजन होत आहे. पुलाचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावे, यासाठी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे आपण नियमित पाठपुरावा करणार आहोत. सुमारे पाच कोटी रुपये खर्चाच्या या पुलासोबतच लगतचा रस्ताही पूर्ण करण्याचा आपला मानस आहे.
मागील दहा वर्षांत कुडाळ-मालवण मतदारसंघातील अनेक विकासकामे रखडली. अनेक पुलांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. ही कामे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. लोकांनी आपल्याला काम करण्यासाठी निवडून दिले आहे, टीका करण्यासाठी नाही. त्यामुळे विकासकामांवर लक्ष केंद्रित केले आहे, असे राणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या नकाशावर २८८ मतदारसंघ आहेत; मात्र मागील दहा वर्षांत कुडाळ-मालवण मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला. २०२४ पासून हा मतदारसंघ पुन्हा विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले आहे. विकासकामे करणे हे आपले कर्तव्य असून, त्याला उपकार समजू नये. मागील दहा वर्षांत ही कामे का झाली नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दीड वर्षातील कामांचा हिशेब देण्याचे आव्हान स्वीकारले
आपण या मतदारसंघात काय काम करतो, हे पुढील दीड वर्षांत नागरिकांनी पाहावे. ज्यांनी दहा वर्षांत कामे केली नाहीत, ते आता आपल्याकडे दीड वर्षातील कामांचा हिशेब मागत आहेत. त्यांचे आव्हान आपण स्वीकारले आहे, असे आमदार राणे म्हणाले.
आपली स्पर्धा कोणाशीही नसून, विकासाच्या आणि बौद्धिक स्तरावरील कामाची स्पर्धा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विधानसभेत मतदारसंघाचे प्रश्न मांडताना आपण कोणत्या बाकावर बसतो, यापेक्षा जनतेचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कुडाळ-मालवणच्या जनतेने राणे कुटुंबाला भरभरून प्रेम दिले आहे. या मतदारसंघाने आपल्याला निवडून दिले. जिल्ह्यातून आपले वडील खासदार झाले असून, आपले बंधू पालकमंत्री आहेत. येथील जनतेने दिलेले प्रेम आणि विश्वास विसरता येणार नाही, असे भावोद्गारही त्यांनी काढले. कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या विकासासाठी यापुढेही उच्च दर्जाची कामे करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी जिल्हा नियोजनच्या आराखड्यात मतदारसंघाला पुरेसा निधी मिळत नव्हता; मात्र आता आराखडा हजार ते बाराशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एवढ्यावर न थांबता तो किमान पाच हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुती सरकारच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळत असून, जिल्हा परिषदेचे कामही पारदर्शकपणे सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात जिल्हा परिषदेसाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.








