
रस्ते काँक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे लोकार्पण
उमेद अंतर्गत महिला बचत गटांना वाहनांचे वितरण
कुडाळ : मधील रस्ते काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र लोकार्पण आणि उमेद अंतर्गत महिला बचत गटांना वाहन वाटप कार्यक्रम आज कुडाळ येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कुडाळ शहर दर्जेदार शहर बनविण्यासह एमआयडीसीचा विकासात्मक कायपालट करण्यात येणार असून एमआयडीसीत भव्य स्टेडियम उभारण्यात येणार आहे. तसेच शहरात विविध विकासकामे करण्यात येणार असल्याचे आमदार राणेंनी आश्वासित केले. रस्त्यांची कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण करण्याची सूचना देखील त्यांनी केली.
यात कुडाळ एमआयडीसी सर्कल ते पिंगुळी म्हापसेकरतिठा रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण करणे तसेच एमआयडीसीमधील अंतर्गत मुख्य रस्ता काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. शहरातील डाॅ.पाटील हाॅस्पीटल समोरील नगरपंचायत उद्यान येथे नगरपंचायतीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा आमदार राणे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक संघाचे चंद्रकांत अणावकर यांच्या हस्ते फीत सोडून संपन्न झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, जि.प.उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, मुख्याधिकारी खंडू पवळ, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, काका कुडाळकर, संजय पडते, दिपलक्ष्मी पडते, दीपक नारकर, विनायक राणे, प्रकाश सावंत, ओंकार तेली, नगरसेवक अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, नयना मांजरेकर, आफरील करोल, राजीव कुडाळकर, नागेश नेमळेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
त्यानंतर कुडाळ पंचायत समिती, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुक्यातील बचत गटांना शेतमाल व अन्न वाहतूक वाहनांचा वितरण समारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्यमनगर येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे पार पडला. यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर, उमेद अभियानचे तालुका व्यवस्थापक गणेश राठोड यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व बचतगटातील महिला उपस्थित होत्या.








