ठळक घडामोडी

पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनास मनसेचा जाहीर पाठिंबा!

जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वात मनसैनिक आंदोलनात सहभागी होणार

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहीती

कुडाळ : पिंगुळीतील पाझर तलाव अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा असून सोमवार २ नोव्हेंबर पासून होणा-या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत अशी माहीती मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली.
       श्री.किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील सार्वजनिक शासकीय पाझर तलावाला लागून नियमबाह्य रित्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असून सदर प्रकल्पाच्या नियमबाह्य कामांमुळे तलावातील पाणी भविष्यात दूषित होण्याची भिती आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पिंगुळी गावाच्या पिण्याच्या पाण्यावर फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर पाझर तलाव हा राष्ट्रीय वेटलँड  ऐटलास मध्ये मॅच झालेला असून त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तलाव संरक्षित आहे. असे असताना तलावाच्या बफरझोन आणि पाणलोट क्षेत्रामध्ये नियमांचे उल्लंघन करून आर्थिक बळाच्या जीवावर परवानगी दिल्याचे दिसून येत आहे. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत स्वतः ठिकठिकाणी भेटी देत आहेत तर दुसरीकडे सदर निसर्गाचे देणं असलेला कायमस्वरूपी पाझर तलावाच्या वेटलँड समितीचे अध्यक्ष असून देखील सदरच्या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत. तसेच सदर तलाव ज्यांच्या अखत्यारित येतो त्या लघु पाटबंधारे विभागाकडून देखील या गंभीर बाबीकडे जाणून बुजून डोळे झाक करण्यात येत असल्याचा आरोप मनसे उपजिल्हाध्यक्ष  कुणाल किनळेकर यांनी केला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वात मनसैनिक या आंदोलनात सहभागी होणार असून ग्रामस्थांनी पुकारलेल्या सोमवारच्या उपोषण आंदोलनास मनसेचा पाठींबा असल्याचे या पत्रकाद्वारे श्री.किनळेकर यांनी जाहीर केले आहे.

error: Content is protected !!