ठळक घडामोडी

कुडाळ महिला-बाल रुग्णालयाच्या फायर सिस्टीमची पाणी साठवणूक टाकी चुकीच्या ठिकाणी!

महाविकास आघाडी आक्रमक; टाकी स्थलांतरित करण्याची मागणी

अभय शिरसाट, बाळा पावसकर व सुशिल चिंदरकर यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

कुडाळ : येथील महिला व बाल रुग्णालय येथे अग्निशामक यंत्रणेच्या पाणी साठवणूक टाकीचे काम चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी होत असल्याचा आरोप कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. याबाबत काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रवक्ते बाळा पावसकर व सुशिल चिंदरकर यांनी शनिवारी रूग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधले. सुरू असलेल्या कामामुळे लगतच्या ऑक्सिजन प्लांट शेडला धोका निर्माण झाल्याचे सांगून, पाणी साठवणूक टाकी मागील बाजूला स्थलांतर करण्याची मागणी यावेळी अभय शिरसाट यांनी केली.
        कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे अग्निशामक यंत्रणेसाठी लागणाऱ्या पाण्याच्या टाकी बांधण्याच्या कामामुळे सीएसआर फंडातून खर्च केलेली 50 लाख रुपये किमतीची ऑक्सिजन प्लांटसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे तसेच महिला रुग्णालय येथील पार्किंगची जागा कायमस्वरूपी नष्ट झाली आहे, असा आरोप कुडाळ महाविकास आघाडीच्या अभय शिरसाट यांनी यावेळी केला.
      कुडाळ महिला बाल रुग्णालय अग्निशामक यंत्रणेच्या साठवण टाकीसाठी 3/08/2024 रोजी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून रु.3085950/- मंजूर झाले. महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा (mgp) यांच्या निष्काळजीपणामुळे गेली दोन वर्ष हे काम पूर्ण होऊ शकले नाही. एमजीपीच्या माध्यमातून होत असणाऱ्या पाणी साठवण टाकीच्या फाउंडेशन साठी जो खड्डा खोदण्यात आला आहे, तो ऑक्सिजन प्लांटच्या इमारतीच्या जवळ असल्याने ऑक्सिजन प्लांटच्या पायऱ्यांचा भाग या खड्ड्यामध्ये कोसळला आहे. तर 50 लाख रुपये खर्च केलेल्या इमारतीला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. याबाबत, कुडाळ तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून महिला बालकल्याण वैद्यकीय अधीक्षक डॉ.तेलंग यांचे लक्ष वेधण्यात आले. रूग्णालयाच्या मागे जागा उपलब्ध असतानाही एमजीपीने भविष्यात महिला बाल रुग्णालयाच्या अडचणीचा विचार न करता कंत्राटदाराला सोप्या पद्धतीने काम करायला मिळावे यासाठी ही जागा निवडली असा थेट आरोप यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आल्याची माहीती अभय शिरसाट यांनी दिली.
     दरम्यान सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता एमजीपीच्या अधिकारी व आरोग्य विभागांची अधिकाऱ्यांच्या समोर बैठक घेऊन नवीन जागा निवडण्याचे निश्चित करण्यात आले. तोपर्यंत कत्राटदारांने काम बंद ठेवावे असे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेलंग यांनी दिले. यावेळी कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री.अभय शिरसाट, उबाठा शिवसेनेचे शहर संघटक श्री.सुशिल चिंदरकर, तालुका प्रवक्ते बाळा पावसकर, काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष तरबेज शेख आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!