
५ लाख ३८ हजार रुपयांचा साठा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल
मालवण पोलिसांची कारवाई
मालवण : महेश कदम
मालवण दांडी परिसरात अवैध दारू विक्रीवर पोलिसांनी काल शनिवारी रात्री टाकलेल्या छाप्यात गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ८० बॉक्स जप्त करण्यात आले असून, जप्त केलेल्या या मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ३८ हजार रुपये आहे. या प्रकरणी ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री.भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, पोलीस हवालदार सुहास पांचाळ आणि पोलीस हवालदार सुप्रिया पवार यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.
अवैध दारू धंद्यांविरुद्ध पोलिसांनी हाती घेतलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.







