ठळक घडामोडी

आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला अन् काळाचा घाला; पाय घसरल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू!

कुडाळ : माणगाव-आंबेरी येथील पुलानजीक असलेल्या देवकोंड परिसरात निर्मला नदीपात्रात बुडून एका ३३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रतिराज उर्फ राजू भार्गव कुडपकर (वय ३३, रा. वेंगुर्ला कॅम्प, भटवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेला असताना दगडावर पाय घसरून पाण्यात पडून बुडाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
      मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिराज, त्याचा चुलतभाऊ व एक मित्र असे तिघे जण देवकोंड येथे आले होते. त्यापैकी एका तरुणाचे नातेवाईक या परिसरात राहत असल्याने ते नातेवाईकांकडे आले होते. काल दुपारी तिघेही मित्र आंघोळ करण्यासाठी देवकोंड नदीपात्रात गेले होते. यावेळी प्रतिराज हा नदीपात्रात आंघोळ करत असताना तो बुडाला. या घटनेची फिर्याद त्याचे चुलतभाऊ संतोष सुदर्शन कुडपकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहीती मिळताच माणगाव दूरक्षेत्राचे आणि कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव पुढील कार्यवाही केली. कुडाळ पोलीसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या अकाली निधनाने कुडपकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

error: Content is protected !!