ठळक घडामोडी

नेरूरमध्ये ७ नोव्हेंबरला भव्य नरकासुर वध स्पर्धा!

रणझुंझार मित्र मंडळ आणि जि. प.सदस्य रुपेश पावसकर यांचे आयोजन

प्रथम क्रमांकाला २० हजारांचे पारितोषिक; रुपेश पावसकर यांची माहिती

कुडाळ : रणझुंझार मित्र मंडळ, नेरूर आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर पंचक्रोशी मर्यादित ‘कलेचा देव कलेश्वर – भव्य नरकासुर वध स्पर्धा २०२६’ या स्पर्धेचे दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते १० या वेळेत नेरूर चव्हाटा येथील हनुमान मंदिर परिसरात ही स्पर्धा रंगणार असल्याची माहिती जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी दिली.
      या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी २० हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये व चषक, तर तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व चषक असे पारितोषिकांचे स्वरूप आहे. याशिवाय सहभागी होणाऱ्या इतर सर्व मंडळांना प्रत्येकी एक हजार रुपये उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेत नरकासुर प्रतिमा, वेशभूषा व रंगसंगती, चल चित्र, नावीन्यपूर्ण संकल्पना, सादरीकरण आणि नरकासुर वध, विषय व प्रश्नोत्तरे तसेच वेळेचे पालन या निकषांवर एकूण १०० गुणांच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी जास्तीत जास्त १० मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. सादरीकरणामध्ये नरकासुराचा वध करणे आवश्यक असून, पौराणिक कथेचा आधार घेऊन आवश्यकतेनुसार बदल करण्याची मुभा राहील.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांनी नरकासुर प्रतिमा रात्री ८ वाजेपर्यंत स्पर्धास्थळी आणणे बंधनकारक आहे. उशिरा येणाऱ्या मंडळांचे १० गुण कमी करण्यात येतील. ही स्पर्धा केवळ नेरूर पंचक्रोशीपुरती मर्यादित असून, स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रत्येक संघाला एकदाच सादरीकरण करता येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी कल्पेश मार्गी (८३९०६१६७६०), प्रवीण नेरुरकर (९४२२९४८०२४), संतोष परब (९३७०९८३००३), अमोल शुंगारे (८६०५४६४०५६) आणि कृष्णा पाटकर (९३५६०२२३८७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!