ठळक घडामोडी

विजयराव नाईक फार्मसी कॉलेजचा तिसरा दीक्षांत समारंभ उत्साहात!

६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण

सिंधुदुर्ग : युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी चा तिसरा दीक्षांत समारंभ महाविद्यालयात शनिवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६  रोजी पार पडला. हा दीक्षांत समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या पूर्वसूचनेनुसार घेण्यात आला. हा दीक्षांत समारंभ उन्हाळी सत्र २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने आयोजित केला होता. या दीक्षांत समारंभास संस्थेचे सचिव डॉ. रमण बाणे, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ.अमोल उबाळे, विभाग प्रमुख प्रा. अमर कुलकर्णी, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. ऋषिकेश सोरटे आणि परीक्षा सह प्रभारी प्रा. नमिता सागवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
       या कार्यक्रमादरम्यान जवळजवळ ६२ विद्यार्थ्यांना औषध निर्माता शपथ घेऊन पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच विविध विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयात रुजविण्यात आलेली शिस्त, वेळेचे महत्त्व, वक्तशीरपणा आणि व्यावसायिक मूल्ये यांचा त्यांच्या सध्याच्या नोकरीतील कार्यप्रदर्शनावर झालेला सकारात्मक परिणाम अत्यंत प्रभावीपणे मांडला.
       याव्यतिरिक्त या कार्यक्रमादरम्यान डॉ. रमण बाणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून फार्मसी क्षेत्राचे वर्तमानातील महत्त्व, भविष्यातील संधी आणि या क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिक व्याप्तीबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची वाढती भूमिका स्पष्ट करत, फार्मसी क्षेत्रातील विविध कार्यांमध्ये AI कशाप्रकारे पूरक व सहाय्यक ठरू शकते, याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रा. मंदार सावंत यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सुरू ठेवण्याचे आवाहन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय प्रशासन आवश्यक त्या सर्व सुविधा व सहकार्य उपलब्ध करून देण्यास सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. डॉ. राजेश जगताप यांनी आपल्या मनोगतातून यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक प्रवेशसंख्या असलेल्या महाविद्यालयांपैकी आपल्या महाविद्यालयाचे स्थान अधोरेखित केले. तसेच, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करताना नवीन पिढीतील (Gen-Z) विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांवर व त्यांच्या प्रगतीवर प्रकाश टाकला. युवक कल्याण संघाचे अध्यक्ष श्री. वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत यांनी दीक्षांत समारंभाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी विशेष कौतुक केले.
      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नेहा गुरव यांनी केले व प्रा. ऋषिकेश सोरटे यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे आभार मानून दीक्षांत समारंभाची सांगता केली.

error: Content is protected !!