ठळक घडामोडी

कुडाळमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा पर्दाफाश!

वनविभागाची मोठी कारवाई; तिघांना अटक

कुडाळ : वनविभागाने कुडाळ काळप नाका बस डेपो परिसरात सापळा रचून वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या तस्करीचा पर्दाफाश केला. या कारवाईत रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८) याच्यासह तिघांना अटक करण्यात आली. हि कारवाई काल सोमवारी (२ नोव्हेंबर) सायंकाळी करण्यात आली. वाघाचा एक दातसुळा, बिबट्याची दोन नखे आणि सोन्यामध्ये मढवलेले दोन सुळे जप्त करण्यात आले आहेत, अशी माहीती कुडाळ वनविभागाकडून देण्यात आली. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
     वनविभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने पैशांच्या लोभापोटी बनावट गिऱ्हाईक बनून गेलेल्या वनाधिकाऱ्यांनाच वाघनखांच्या विक्रीचा व्यवहार करण्यासाठी वेंगुर्ला बसस्थानकात बोलावले. तेथे १२ वाघनखांच्या विक्रीसाठी दोन लाख ५० हजार रुपयांचा व्यवहार निश्चित करण्यात आला. त्यानंतर वाघनखे घेऊन एक व्यक्ती कुडाळ बस डेपोमध्ये येईल आणि त्याच्याकडे रोख रक्कम द्यावी, असे संशयित आरोपीने वनाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने कुडाळ काळप नाका येथील बस डेपोच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचला आणि तीघांना ताब्यात घेतले.  या प्रकरणी वनपाल नेरूर तर्फ हवेली यांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन संशयित आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी, तर तिसऱ्या संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
      ही कारवाई उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अतिरिक्त कार्यभार उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल संजय हजारे, सूर्यकांत सावंत, गौरेश राणे, अतुल खोत, ब्रह्मकुमार भोजने, अनिकेत माने, समीर खरवत, प्रवीण कमळकर आणि चालक राहुल मयेकर यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!