ठळक घडामोडी

बेकायदेशीर भाडेतत्त्वावरील दुचाकींवर कारवाई होणार!

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांचे आश्वासन

मालवण : महेश कदम
      मालवण शहर व पंचक्रोशीमध्ये देवबाग, तारकर्ली, वायरी इत्यादी ठिकाणी बेकायदेशीरपणे पर्यटकांना भाड्याने दुचाकी देण्याचा व्यवसाय सुरू असून, त्यामुळे परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘मालवण शहर रिक्षा चालक मालक संघटना’ यांच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेऊन निवेदन दिले.
     या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद देत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांनी, यासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयाला तात्काळ पत्र दिले जाईल असे स्पष्ट केले. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत रिक्षा व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, रिक्षा व्यावसायिकांनी कोणताही कायदा हातात घेऊ नये; विनापरवाना दुचाकी भाड्याने देणाऱ्यांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
        निवेदनात मालवण शहर, देवबाग, तारकर्ली आणि वायरी परिसरात खासगी दुचाकी मालक कोणतेही कायदेशीर परवाने नसताना पर्यटकांना बेकायदेशीरपणे दुचाकी भाड्याने देत आहेत. यासाठी उघडपणे जाहिरात फलकही लावले जात आहेत. पर्यटकांना स्थानिक रस्त्यांची व खडतर चढ-उतारांची माहिती नसल्याने अपघातांचा धोका निर्माण होत आहे. परवानाधारक रिक्षा चालक आरटीओचे सर्व नियम पाळून, टॅक्स भरून व पासिंग करून प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत. मात्र बेकायदेशीर दुचाकी भाडेव्यवसायामुळे रिक्षाचालकांना पर्यटक प्रवासी मिळणे कठीण झाले असून इन्शुरन्स, बँकेचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. या बेकायदेशीर व्यवसायावर लवकरात लवकर कायदेशीर बंदी न आणल्यास संपूर्ण मालवण तालुक्यातील रिक्षा व्यवसाय बंद करून उपोषणास बसावे लागेल, असा इशारा संघटनेने दिला आहे. याप्रसंगी मालवण शहर रिक्षा चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!