
जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांची प्रमुख उपस्थिती; आरोग्यविषयक जनजागृतीपर मार्गदर्शन
कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची कार्यशाळा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र) पणदूर येथा नुकतीच पार पडली.
या कार्यशाळेला जि.प.उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत गावागावांत आरोग्यविषयक जनजागृती करणे, नागरिकांना आरोग्याच्या विविध सुविधांची माहिती देणे, स्वच्छता, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, पोषण आणि निरोगी जीवनशैली याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम व्हावे, नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे आणि निरोगी समाजाची निर्मिती व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर : वर्षा शिरोडकर (तालुका आरोग्य अधिकारी), वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता सुधीर पराडकर व डॉ. प्राजक्ता देसाई, पल्लवी पणदूरकर (सरपंच, पणदूर), प्रकाश परब (सरपंच, बांबुळी), रावजी कदम (सरपंच, सरंबळ), पूनम पवार (सरपंच, डिगस), शैलेश घाटकर (उपसरपंच, वेताळबांबर्डे), बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या पर्यवेक्षिका ललिता कासले, ग्रामपंचायत अधिकारी स्वप्ना मसगे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पणदूर अंतर्गत सर्व उपकेंद्रांचे कर्मचारी उपस्थित होते.
‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ या ब्रीदवाक्याखाली हे अभियान १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबवले जात आहे. गावातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ करणे, रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व आरोग्यदायी वातावरण निर्मिती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अंतर्गत गावात गरोदर मातांची नोंदणी व तपासणी, बालकांचे १०० टक्के लसीकरण, कुपोषण निर्मूलन, क्षयरोग-कुष्ठरोग निर्मूलन, डेंग्यू-मलेरिया नियंत्रण, मधुमेह-रक्तदाब तपासणी, शुद्ध पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयांवर जनजागृती व गृहभेटी सुरू आहेत.
७० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गावाला ‘आरोग्य संपन्न गाव’ म्हणून घोषित करून राज्य व जिल्हा स्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन यावेळी सरपंच व आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.









