ठळक घडामोडी

पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरूच!

माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांची भेट

कुडाळ : प्रतिनिधी
        पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या रक्षणासाठी जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी कुडाळ येथील प्रांत-तहसील कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या तिस-या दिवशी बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला.
      यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रेया परब, नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, पं.स.सदस्य योगेश धुरी, बाळा पावसकर, संजय बोभाटे, दिपक आंगणे, दिपक गावडे, संदीप म्हाडेश्वर, अमित राणे, गोट्या चव्हाण, बंड्या कोरगावकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
      यावेळी कुडाळचे तहसीलदार तथा प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा करत तलावाकडे जाणारा बंद केलेला रस्ता तातडीने खुला करण्यासह तलावातील पाण्याचा उपसा करणारे तीन पंप जप्त करून संबंधित विकासकावर फौजदारी कारवाई करण्याची स्पष्ट सूचना केली. या प्रकरणात महसूल प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत राऊत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याशीही थेट दूरध्वनीवरून चर्चा केली. दरम्यान सायंकाळी माजी आमदार वैभव नाईक यांनी उपोषणाला भेट दिली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नगरसेवक मंदार शिरसाट, बबन बोभाटे, बाळा पावसकर यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
     

error: Content is protected !!