ठळक घडामोडी

आमदार निलेश राणे यांची पिंगुळी पाझर तलाव उपोषणस्थळी भेट!

कुडाळ : पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या चौथ्या दिवशी महत्त्वपूर्ण घडामोड घडली. आमदार निलेश राणे यांनी दुपारी उपोषणस्थळी भेट देत ग्रामस्थांना विश्वास दिला. त्यानंतर प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार संबंधित मिळकतीतील सुरू असलेली विकासकामे पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याची, शेतकऱ्यांचे वहिवाटीचे रस्ते खुले करण्याची आणि तलावातील पाणी प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेण्याची घोषणा केली. त्यामुळे पिंगुळी तलाव बचाव आंदोलनातील प्रमुख मागण्यांबाबत प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
              आ.निलेश राणे म्हणाले, आधी पिंगुळी  ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली होती. तलावाला हात लावला जाणार नाही आणि मंजूर आराखड्यातील पायवाट बंद केली जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली होती. यापुर्वी पिंगुळी  ग्रामस्थांना दिलेला शब्द आणि विश्वास कायम असल्याचे सांगण्यासाठी आपण उपोषणस्थळी आलो आहोत. आपण बिल्डर किंवा डेव्हलपरच्या बाजूने नसून जनता आणि कोकणच्या बाजूने उभे आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत संबंधित प्रकल्पाचे काम थांबविण्याबाबत तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आंदोलनकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शविला.
                यानंतर प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात सहा ते सात मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बिनशेतीचा आदेश रद्द करणे, वहिवाटीच्या रस्त्यांवरील अडथळे दूर करणे आणि तलावातील पाण्याचे प्रदूषण रोखणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, त्यांच्या निर्देशानुसार संबंधित मिळकतीतील सुरू असलेली विकासकामे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित ठेवण्यात यावीत, असे संबंधित कंपनीला कळविण्यात येत आहे.स्थानिक शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या रस्त्यांवर त्यांच्या वापरासाठी कोणताही अडथळा निर्माण करू नये आणि हे रस्ते तातडीने खुले करून द्यावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत. पाझर तलावातील पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने ते कोणत्याही प्रकारे प्रदूषित होणार नाही, याची योग्य ती दक्षता घेण्याचेही सांगण्यात आले आहे.
विकासकामांना स्थगिती देण्याचा निर्णय, वहिवाटीचे रस्ते खुले करण्याबाबतची कार्यवाही आणि प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना या माध्यमातून आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. आ. निलेश राणे यांनी उपस्थित केलेले मुद्देही प्रशासनाच्या निर्णयात समाविष्ट झाले असल्याचे प्रभारी प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयानंतर आगामी दिवाळीचे दिवस लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी आपले आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती प्रभारी प्रांताधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पिंगुळी तलाव बचाव आंदोलनाला आता प्रशासकीय निर्णयाच्या रूपाने महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
     यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व संजू, उपनेते संजय आंग्रे, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, संजय पडते, काका कुडाळकर, सभापती मिलिंद नाईक यांच्यासह शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!