
सिंधुदुर्ग एलसीबी पथकाची यशस्वी कामगिरी
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून गुन्ह्याचा उलगडा; चोरीचे दागिने कर्नाटकात ठेवल्याची कबुली
सिंधुदुर्ग : सावंतवाडी बसस्थानकातून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोघांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. दीपक संतोष सकट (वय २७) आणि अमृता दीपक सकट (वय २१, दोघेही रा. एस. एम. हायस्कूलमागे, किणई, कणकवली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. दोन्ही संशयितांना पुढील चौकशीसाठी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहीती एलसीबीकडून देण्यात आली आहे.
एलसीबीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार,सावंतवाडी बसस्थानक येथे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याप्रकरणी २१ सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दीपक सकट व अमृता सकट यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या पथकाने ६ नोव्हेंबर रोजी कणकवली तालुक्यातील गडनदीजवळील उभादेव मंदिर परिसरात सापळा रचून दोन्ही संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेले १२ तोळे सोन्याचे दागिने कर्नाटक येथे ठेवले असल्याचेही त्यांनी तपासात सांगितले.
दोन्ही संशयित आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, महिला हवालदार रुपाली खानोलकर, हवालदार जॅकसन घोन्सालवीस आणि पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर यांचा समावेश होता.









