ठळक घडामोडी

पिंगुळी ग्रामस्थांचे पाचव्या दिवशी उपोषण स्थगित; प्रशासनाचे लेखी आश्वासन!

पाझर तलाव बचाव आंदोलनाला यश; बांधकामे स्थगित ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

पिंगुळी ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय! घोषणांनी प्रांत कार्यालय परिसर दणाणला

कुडाळ : पिंगुळीतील पाझर तलावाच्या रक्षणासाठी जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी मागील पाच दिवसांपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर आज पाचव्या दिवशी दुपारी प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आले.
      प्रांत अधिकारी पाटील यांनी दिलेल्या पत्रकात असे नमूद करण्यात आले की; वरील विषयांकित प्रकरणी आपण मांडलेल्या मुदयांच्या अनुषंगाने तसेच उपस्थित उपोषणकर्त्यांशी प्रशासनाने केलेल्या चर्चेनुसार उपस्थित मुद्दयांच्या अनुषंगाने पुढील उचित कार्यवाहीसाठी संदर्भ क्र. ४ चे पत्रान्वये संबंधित विकासक कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत. यात स्थानिक शेतक-यांच्या वहिवाटीचे रस्ते शेतक-यांना वापरणेस अटकाव करु नये, तसे असल्यास सदर रस्ते तात्काळ खुले करुन देणेत यावेत.पाझर तलावातील पाणी ग्रामस्थांच्या पिण्यासाठी वापरण्यात येत असल्याने, ते कोणत्याही प्रकारे प्रदुषित होणार नाही, याबाबत योग्य ती दक्षता घेणेत यावी.याच अनुषंगाने लगतचे सार्वजनिक पाण्याचे स्रोत आटणार नाहीत किंवा त्यास कोणतीही बाधा पोचणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. उक्त मिळकतीमध्ये सुरु असलेली बांधकामे उपरोक्त नमूद मुद्दयांच्या अनुषंगाने उचित कार्यवाही होईपर्यंत स्थगित ठेवणेत यावीत. तरी सध्या दिपावली सण व दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता, कृपया आपले उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे पत्र दिले. त्यानंतर सडवेलकर व ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करीत हा पिंगुळी ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असल्याचे स्पष्ट केले. पिंगुळी ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो, अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी ग्रामस्थांनी केली.
     यावेळी माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, नगरसेवक मंदार शिरसाट, संजय वेतुरेकर, ममता राऊळ, दीपक गावडे, बाबल गावडे, दर्शन कुडव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!