ठळक घडामोडी

मनसे नेते माजी आम.बाळा नांदगावकर यांचा पिंगुळी तलाव उपोषणाला पाठिंबा; एसआयटी चौकशीची मागणी!

कुडाळ : पिंगुळीतील पाझर तलावाच्या रक्षणासाठी जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांच्या येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आज मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, नेते शिरीष सावंत, सरचिटणीस संदीप दळवी यांनी भेट देऊन पाठींबा दिला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
     बाळा नांदगावकर म्हणाले, विकास हा झालाच पाहीजे, तो विकास होताना विनाश कुठे होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. दुर्देवाने मला या ठिकाणी सांगावे लागतय की ती काळजी पिंगुळीत घेतलेली नाही. त्यामुळेच पिंगुळीतील पाझर तलावाच्या रक्षणासाठी जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी हे उपोषण सुरू केले आहे. पाझर तलाव वाचावा याची ग्रामस्थांना चिंता आहे. या पाझर तलावाच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली अतिक्रमण सुरू आहे, भविष्यात त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याची दखल घेतली असून, इथली वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी आज आम्हाला पाठवले आहे. आम्ही याचा रिपोर्ट त्यांना सादर करणार आहोत.  देशात लोकशाही जिवंत राहीली की नाही हाच प्रश्न पडत आहे. हा तलाव वर्षांनुवर्षे पिढ्यानपिढ्या तुमचाच आहे. त्याचे पाणी आपण पित आलेला आहात. तलावावर जरी शासनाचाचा अधिकार असला तरीही तेवढाच अधिकार तुमचा देखील आहे. कोणत्याही गोष्टीचा विकास करायचा असेल तर तिथल्या स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेतले पाहीजे. त्यांना विचारले पाहिजे, त्यांच्याशी बोलले पाहिजे, त्यांचे मत जाणून घेतले पाहीजे. लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की, विकास करत असताना तुम्ही स्थानिक लोकांना विश्वासात घ्यावे, तुम्ही नेमकं काय करणार आहात ते त्यांना सांगावे. मात्र तसे न झाल्यास विरोध हा होणारच आहे. पिंगुळीतील पाझर तलाव प्रश्नी पुकारले आंदोलन सुरूच ठेवा, यश निश्चित मिळेल. मनसेचा तुम्हाला जाहीर पाठींबा आहे. मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस तुमच्या सोबत आहेत. सासोली प्रकरणी जशी एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे तशीच चौकशी पिंगुळीतील पाझर तलाव प्रश्नाची एसआयटी नेमून चौकशी झाली पाहिजे, अशी ग्रामस्थांसह आमची मागणी आहे. जेणेकरून याची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर येईल. पालकमंत्र्यांनी या उपोषणाची दखल घेऊन जनतेच्या पालकत्वाची भूमिका योग्य पद्धतीने सांभाळली पाहीजे. मुख्यमंत्र्यांनी देखील या उपोषणाची दखल घेतली पाहीजे. त्यांनी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले पाहीजेत. जर सरकारने दडपशाही करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास गाठ या सर्वसामान्य नागरिकांशी आहे, हा सामान्य नागरिक तुम्हाला कदापी माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आपण जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांशी देखील बोलणार आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमच्या मागण्या निवेदनातून त्यांच्यापर्यंत पोचवू असे आश्वासन बाळा नांदगावकर यांनी दिले.

error: Content is protected !!