ठळक घडामोडी

मालवण-कट्टा मधील आठ बंगल्यांमध्ये घरफोडी; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दोघे ताब्यात!

निसर्ग नगरी संकुलातील चोरीचा छडा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गची यशस्वी कामगिरी

मालवण : प्रतिनिधी
      मालवण-कट्टा येथील निसर्ग नगरी संकुलातील तब्बल आठ बंगल्यांचे दरवाजे उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज गुरुवारी ताब्यात घेतले. सुशील यशवंत आळवे (वय २२, रा. देवली गवाणवाडी, मालवण) आणि संतोष मधुसूदन पांगे (वय ४८, रा. धुरीवाडा, मालवण) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्यांना मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली.
     एलसीबीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मालवण-कट्टा येथील निसर्ग नगरी संकुलात २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी संकुलातील आठ बंगल्यांच्या दरवाजांचे कडी-कोयंडे उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
       या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला.
      या तपासादरम्यान गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सुशील आळवे आणि संतोष पांगे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. वैद्यकीय तपासणीनंतर दोघांनाही पुढील तपासासाठी मालवण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे, अशी माहीती एलसीबीकडून देण्यात आली.
     ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅकसन घोन्साल्वीस, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि सायबर विभागाच्या धनश्री परब यांचा समावेश होता.

error: Content is protected !!